Skip to main content

पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे

सोनेरी मखमली रुपेरी पंख कितिकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे

अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती
साळीवर झोपली जणु का पाळण्यात झुलती

झुळकन्‌ सुळकन्‌ इकडून तिकडे किती दुसरी उडती
हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती

पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलिकडिल तो सोन्याचा गोळा

Rate this poem
No votes yet
Reviews
No reviews yet.