Skip to main content

हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात, अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रुलीला, अवगत नव्हत्या कुमारिकेला.
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला?

पुरा विनोदी संध्यावात, डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फुलराणीला:-
'छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पहात होती?
कोण बरे त्या संध्येतून, हळूच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणींना?'
लाजलाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी!

आंदोली संध्येच्या बसुनी, झोंके झोंके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल, नभी चमकते ते ग्रहगोल!
जादूटोणा त्यांनी केला, चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणी ही, आज कशी तळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फुलराणीला?

या कुंजातून त्या कुंजातून, इवल्याशा या दिवट्या लावून,
मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळखेळते वनदेवीही.
त्या देवीला ओव्या सुंदर, निर्झर गातो; त्या तालावर
झुलुनी राहिले सगळे रान, स्वप्नसंगमी दंग होऊन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ती, कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होऊनी, स्वप्ने पाही मग फुलराणी!

'कुणी कुणाला आकाशात, प्रणयगायने होते गात;
हळूच मागुनी आले कोण, कुणी कुणा दे चुंबनदान !'
प्रणयखेळ हे पाहुनी चित्ती, विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमाच्या प्रेमदेवता, वाऱ्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरून खाली, फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुनवूनी नयनी, त्या वदल्या ही अमुची राणी!

स्वर्गभूमीचा जुळवीत हात, नाचनाचतो प्रभातवात;
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला, हळूहळू लागती लपावयाला
आकाशीची गंभीर शांती, मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संजयजाल, संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवूनी, हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती, तरीही अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, लख्खं पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळीत मोती, दिव्या वऱ्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालूनी, हांसत हांसत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबी फेटा, झगमगणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला, हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फुलराणीचे!

गाऊ लागले मंगलपाठ, सृष्टीचे गाणारे भाट;
वाजवी सनई मारुतराणा, कोकीळ घे तानावर ताना!
नाचू लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज!
नवरदेव सोनेरी रविकर, नवरीही फुलराणी सुंदर;
लग्न लागते सावध सारे, सावध पक्षी सावध वारे!
दवमय हा अंत:पट फिटला, भेटे रविकर फुलराणीला!

वधूवरांना दिव्य रवांनी, कुणी गाईली मंगलगाणी;
त्यात कुणीसे गुंफीत होते, परस्परांचे प्रेम!अहा ते!
आणिक तेथील वनदेवी ही, दिव्य आपुल्या उछ्वासांही
लिहित होत्या वातावरणी, फुलराणीची गोड कहाणी!
गुंततगुंतत कवि त्या ठायी, स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला, नवगीतांनी फुलराणीला!

Rate this poem
No votes yet
Reviews
No reviews yet.